
Y A T I N D R A S H I N D E
पानातली कविता
शांत होत जग ते
निमचीत एका पुस्तकात
घट्ट अवघडून कुठे
३५/ ३६व्या पानांत ..
.
कुठेतरी कोपरयातून
येत होता बारीकसा प्रकाश
अडकलेल त्या सावलीत
तेव्हढ आठवणीतलं आकाश ..
.
तास गेले कि वर्षे … हा भास कसा ?
पण आत्ताच मी सूर्याकडे पहात होते
खूप राजस होता तो … हवा तसा
हवा सुद्धा तशीच … स्वप्नाळू ..
.
खिळले मी त्या स्वप्नात
पुर्णतृप्ती होती ती
पूर्णमदः पूर्णमिदम हा हा
कि सर्वः शून्यं शुण्येंतस्थिः सर्वं ? ..
.
अनंतात भिनले होते मी
एका सुखद स्पर्शाने
बोल अबोल
तीव्र सळसळणार्या लहरीने ..
.
पक्की पकड त्याची
आपलीसी करणारी
देठावर निसटली बोटं
अलगद भिरणारी ..
.
किती क्षणार्धात वेगळी झाले मी
माझ्या फांद्यांपासून
अर्पणही केले त्यांनी मला
टचकन ! ..
.
माझी मी होते मी नेहमी
कित्येकांनी वाहिले होते सर्वस्व
वाहून गेल्या कित्येक हृदयगाथा
दूर पुरामध्ये ..
.
त्या बुडालेल्या नाविकांच्या
तरंगत होत्या नौका
श्वेतपक्ष्यांची घरटी होती त्यात
उडून परतणाऱ्या फक्त माझ्याच नजरा ..
.
त्याची नजर मात्र
एका पाखराची भरारी
दडपल्या मऊ पाकळ्या
उसासे मिट्ट उरले उरी ..
.
शांत समुद्र होता तो
आकाशही निर्मळ त्याच ते
ढग नाही कि वारा
लांब रिकामा किनारा ..
.
अनंतात होते मी आता
अक्षरांच्या बालकांत
अर्थांशी खेळत
कागदी काखेच्या दर्पात ..
.
भक्कम होती त्याची वीण
मला जपण्यासाठी
मी तशीच्या तशी
राहण्यासाठी ..
.
शुष्क निजलेली
स्तब्ध
मन पाकळ्यांची
देखणी जीवाश्म ..
.
मनातली होता होता
कशी पानातली झाले मी
न लवल्या कधी पापण्या
वाट बघत …. …. ….
. . . . . . .
कालांतराने सुगंधित झाली पाने ती …
रंगलेही तिच्या अंगाने
मृत स्वप्नांच्या
स्वप्नांमृताने ..
.
राणी एका छानश्या बागेची
कधी अर्धोन्मिलित आली होती
परीकथेच्या गच्च पुस्तकात कुठे सुकलेली
एक खूप सुंदर कळी होती.
.
यतींद्र